तिरोडा– पी.एम.श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, रतनारा येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय उत्साही वातावरणात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला. या विशेष कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी भूषवले. यावेळी दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि परिसरात पवित्रता आणि ज्ञानाची ऊर्जा पसरली.
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना लायकराम भेंडारकर यांनी गुरुपौर्णिमेचे महत्व उलगडून सांगितले. त्यांनी सांगितले, “गुरुपौर्णिमा हा दिवस केवळ सण नसून आपल्या जीवनातील गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. गुरु म्हणजे केवळ शिकवणारा नव्हे, तर अंधारातून प्रकाशाकडे नेणारा दीपस्तंभ आहे. तो आपल्याला योग्य मार्ग दाखवतो, चुका दुरुस्त करतो आणि आपल्या जीवनाचा आधारस्तंभ ठरतो.
ते पुढे म्हणाले की, “आजच्या काळात जिल्हा परिषद शाळांतील शिक्षक हे खऱ्या अर्थाने समाजाचे खरे हिरो आहेत. मर्यादित साधनसंपत्ती असूनही हे शिक्षक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत. त्यांच्या योगदानामुळेच ग्रामीण भागातील विद्यार्थीही गुणवत्ता आणि संस्कार यामध्ये उजवा ठरत आहेत.”
कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांमध्ये जिल्हा परिषद सदस्य अंजली अटरे, सरपंच सतीश दमाये, उपसरपंच धनपाल धूवारे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिनेश लिल्हारे, तसेच ग्रामपंचायत सदस्य चेतनलाल लिल्हारे, तुंटीराम ढेकवार, बोरकरताई, खैरू नीमा शेख, गुलशन अटरे यांचा समावेश होता.
कार्यक्रमाचे आयोजन शाळेचे मुख्याध्यापक एस.आर. नागपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. शिक्षक आर.एच. शेंबरे, बी.ओ. टेंभुर्णीकर, महेंद्र कस्तुरे, राजू गोखे, जयश्री रेवतकर यांचेही आयोजनात मोलाचे योगदान होते. याशिवाय गावातील विविध मान्यवर, पालकवर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत गुरुंच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली. शाळेच्या परिसरात वातावरण भक्तिमय आणि प्रेरणादायी झाले होते.
कार्यक्रमाच्या शेवटी मान्यवरांनी शिक्षक व विद्यार्थ्यांच्या कार्याचे कौतुक करत शाळेच्या प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या. उपस्थित गावकऱ्यांनी आणि पालकांनी शाळेतील अशा उपक्रमांचे कौतुक करत भविष्यातही सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.








